Blog Details

  • Home -
  • Blog Details
course

शेतीला सुधारणा, व्यावसायिकताच तारेल

मला असं वाटतं...

प्रवीण पाटील ९४२२३३१९२०

ई-मेल : info@mahafeedwsf.net

शेतीमध्ये ‘फर्टिगेशन’ तंत्रावर पायाभूत काम करण्याचे श्रेय असलेल्या ‘महाफिड स्पेशालिटी फर्टिलायझर इंडिया प्रा.लि.’ या कंपनीचे प्रवीण पाटील हे तरुण संचालक आहेत. विद्राव्य खते, जैविक उत्पादने, पीक पोषकांच्या आयात व प्रसारात गेल्या दोन दशकांपासून ते अभ्यासूपणे काम करीत आहेत. 

शेती, शेतकऱ्याच्या विकासाच्या आड दोन मुद्दे सातत्याने अडथळे आणत आहेत. ते म्हणजे सुधारणा (रिफॉर्म्स) आणि व्यावसायिकता (प्रोफेशनलिझ्म). या दोन्ही मुद्यांवर राज्यकर्ते, शासकीय यंत्रणा, समाज, उद्योग विश्‍वाने गांभीर्याने लक्ष द्यायला हवे. शेती हे शास्त्र आहे आणि तो व्यवसायदेखील आहे. त्यामुळे तेथे सुधारणा अत्यावश्यक असतात. मी बघतोय की देशाच्या शेतीला चालना देण्यासाठी वर्षानुवर्षे चांगल्या सुधारणा होत आलेल्या आहेत. आता देखील सुधारणांची एक चांगली व्यवस्था आपल्यासमोर तयार आहे. या व्यवस्थेचा अनुभव, वापर व्हायला हवा. त्यात काही अडचणी असल्या तर पुन्हा पुन्हा सुधारणा करायला हव्यात. तसे झाले तरच शेती व्यवस्था सुदृढ आणि आर्थिकदृष्ट्या बळकट होईल. कारण जग हे आता विकणाऱ्यांचे नसून विकत घेणाऱ्यांचे आहे व बायर-कन्झुमर्स अर्थात ग्राहक-उपभोक्ता हेच सर्वस्व आहे. केवळ नावापुरते बळीराजा म्हणत त्याची लूट करणारी जुनाट व्यवस्था आता चालू ठेवता येणार नाही. शेतीविषयक बाजार, तंत्र, माहिती, पद्धती या सर्व टप्प्यांमध्ये शेतकऱ्याला व्यावसायिकतेकडे घेऊन जावेच लागेल. त्याला संघटित करून मी आधी सांगितल्याप्रमाणे बाजार, लागवड, मशागत अशा सर्व पातळ्यांवर उच्च क्षमतेची व्यवस्था तयार करून द्यावी लागेल. त्याला व्यासपीठ आणि उत्पादित मालाची हमी देखील द्यावी लागेल. पण असे व्यासपीठ किंवा हमी हवेतून येणार नाही. ते खासगी गुंतवणुकीतून, सुधारणावादी धोरणातून येईल. तसे झाल्यास शेतकऱ्यांच्या मनातील निराशा जाईल. गेल्या काही वर्षांची स्थिती पाहिली तर जुनाट व्यवस्थेत हतबल शेतकऱ्याने वेळोवेळी धोरणकर्त्यांना खूप हाका मारल्या आहेत. पण हाका मारून उपयोग होत नसल्याने तो निराश झाला आहे. ही स्थिती घातक आहे. कारण १३० कोटी लोकांना अन्नधान्य व सर्वाधिक रोजगार शेतकरी देत असेल तर त्याची निराशा आपण दूर केलीच पाहिजे. शेतीत गुंतवणुकीशिवाय शेतकऱ्यांची कधीही भरभराट होणार नाही. पण ही गुंतवणूक केवळ उद्योजक, व्यावसायिक, व्यापारी, देशी- विदेशी कंपन्यांमधूनच येईल. सरकारी तिजोरीतून शेती कधीच शाश्वत होणार नाही, हे एकदाचे आपण समजावून घेतले पाहिजे. त्यासाठी तुम्हाला गुंतवणूकदार आणावे लागतील. मी शेतकऱ्याचा मुलगा आणि उद्योजकही आहे. मी आधी शेतकऱ्यांसाठी शास्त्रशुद्ध उत्पादनांच्या निर्मितीत गुंतवणूक करतो. त्यातून तयार झालेले उत्पादन व इतर शेती तंत्र मला २४ तास शेतकऱ्यांना सांगावे लागते. असे केल्याने मग शेतकऱ्याला आधुनिक शेतीतून चार पैसे मिळतात. कृषी उद्योजक म्हणून माझी ही भूमिका इतर बहुतेक कंपन्यांची असते. त्यामुळे कंपन्या, उद्योजक, व्यावसायिक आले तर ते शेतकऱ्यांना लुटतील ही भूमिका आपण सोडायला हवी. तुम्हाला काळजी वाटते ना; मग तसे कायदे करा ना. पण, ते येऊच नये अशी उरफाटी भूमिका नसावी. मी माझ्या वडिलांचेच उदाहरण सांगतो. आमचे वडील डॉ. त्र्यंबकराव पाटील शेतकरी कुटुंबातले. ते जिद्दीने कृषी शिक्षण घेत राहिले. पीएचडी करून त्यांनी महाबीज कंपनीत सेवा केली. मात्र त्यांच्या लक्षात आले, की नोकरीच्या बाहेर पडून शेतकऱ्यांसाठी खूप काही करता येईल. त्यांनी राजीनामा देऊन संशोधन हा पाया ठेवत ‘महाफिड’ची स्थापना केली. ‘फर्टिगेशन’ अर्थात विद्राव्य खतामुळे पीक उत्पादकता वाढतेच; पण अनावश्यक खत वापर टाळला जातो. यामुळे कष्टाचा पैसा आणि सोन्यासारख्या जमिनीची नासाडीही थांबते. त्यासाठी ठिबक तंत्राला ‘फर्टिगेशन’ तंत्राची जोड दिल्यास शेतीला दिशा मिळेल, हे त्यांनी जाणले. त्यामुळे या देशात ‘फर्टिगेशन’ची पायाभरणी २७ वर्षांपूर्वी सर्व प्रथम आम्ही विद्राव्य खतांची आयातीद्वारे केली. आज ‘फर्टिगेशन’चे फायदे तुम्ही देशभर पाहत आहात. हे केवळ उद्योजकतेमुळे किंवा उद्योजकाने केलेल्या गुंतवणुकीतून झाले आहे. बरं केवळ तंत्र आणून चालत नाही. ते तंत्र शेतकऱ्यांना ‘व्यावसायिक पद्धती’ने वापरण्याबाबत शिकवावे लागते. त्यानंतर शेतकऱ्यांना पैसा मिळतो. हा पैसा मिळाल्यानंतरच शेतकरी कोणत्याही कंपनीचे उत्पादन सतत वापरतात. त्यासाठीच मी सांगतोय, की शेती क्षेत्रात सतत सुधारणा कराव्याच लागतील आणि शेतकऱ्यांमध्ये व्यावसायिकता रुजवावीच लागेल. 

                                                                                                                                                                                                (शब्दांकन: मनोज कापडे)

×